डॉ. मत्ते यांचेवर चाकुने जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी जेरबंद

 डॉ. मत्ते यांचेवर चाकुने जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी जेरबंद< >


< >वणी - दीपक चौपाटी परिसरातील डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर सोमवारी (ता.5) दुपारी 1 वाजताच्या सुमारास चौघांनी जीवघेणा हल्ला चढविला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ माजली. पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत आरोपींना जेरबंद केले. भावाचा मृत्यू जिव्हारी लागल्याने डॉ. मत्ते यांच्यावर गुप्ती अन सुरी चालविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अमर हनुमान पेंदोर (रा. रंगनाथनागर, वणी), शुभम ओमप्रकाश खंडारे (रा. वास्तू पार्क लालगुडा), सुप्रीम मिलिंद उमरे (रा.भालर वसाहत), प्रज्योत महेश उपरे (रा. तेली फैल) असे अटकेतील संशयितांची नावे आहेत. डॉ. पद्माकर मत्ते यांच्या क्‍लिनिकमध्ये उपचार घेत असलेल्या आकाश हनुमान पेंदोर (वय21, रा. रंगनाथनगर) याचा 18 जानेवारीला मृत्यू झाला होता. त्या तरुणावर एक दिवसापूर्वी डॉ. मत्ते यांनी उपचार केल्यानंतर घरी जाण्यास सांगितले.

काही कालावधीनंतर त्याची प्रकृती गंभीर झाली व तो दगावला. उपचारात कसूर केल्याचा ठपका ठेवत मृताच्या नातेवाइकांनी क्‍लिनिकची तोडफोड करीत डॉक्‍टर मत्ते यांना मारहाण केली होती. हे प्रकरण पोलिसात पोहचले होते.

डॉ. मत्ते यांनी उपचारात कसूर केल्यानेच भावाचा मृत्यू झाल्याचा ग्रह अमर याने केला. भाऊ आकाशच्या मृत्यूचा बदला घेण्याचे त्याने ठरविले आणि सोमवारी मित्रांसोबत संगनमत करून डॉ. मत्ते यांच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. दुपारी रुग्ण बनून आलेल्यांनी गुप्ती व सुरीने सपासप वार केले आणि मिळेल त्या रस्त्याने पसार झाले होते.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार वैभव जाधव पोलिस पथकासह घटनास्थळी पोहचले. घटनेचे गांभीर्य बघता तातडीने पथके रवाना केली. गोपनीय महितगारांच्या मदतीने आरोपींचा छडा लावताना भालर परिसरातील जंगलात दडलेल्या आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला. आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments