छत्तीसगड हल्ला : मुलाच्या मृत्यूची बातमी आईला टीव्हीवरून
कळली आणि...
- आलोक प्रकाश पुतूल
- छत्तीसगडहून, बीबीसी हिंदीसाठी
रमेश कुमार जुर्री
गावातल्या
काही बायका गल्लीतल्या शेवटच्या घरात शिरतात, आणि
मोठमोठ्याने रडण्याचे आवाज यायला लागतात.
हे
घर रमेश कुमार जुर्री यांचं आहे. डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डचे 35-वर्षांचे रमेश कुमार जुर्री शनिवारी
बिजापूरमध्ये माओवादयांशी झालेल्या चकमकीत मारले गेले.
पंडरीपानी
गाव काकेर जिल्हा मुख्यालयापासून 35 किलोमीटर
अंतरावर आहे.
या
गावाची लोकसंख्या जवळपास 1900 आहे.
इथे गावाच्या मधोमधे एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला एका पोलिसाचा
पुतळा उभा आहे. शेजारी राहाणारे सांगतात की, हा
पुतळा तामेश्वर सिन्हा या पोलीस जवानाचा आहे.
9 जुलै 2007 साली सुकमा जिल्ह्यातल्या मरइगुडात माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 23 जवान मारले गेले होते. यात जिल्हा पोलीस दलाचे सहायक उपनिरीक्षक तामेश्वर सिन्हाही होते.
तामेश्वर सिन्हा नावाच्या
जवानाचा पुतळा या गावात आहे.
शेजारच्या मुलाने सांगितली मृत्यूची बातमी
या
जागेपासून साधारण 100 मीटर
दूर रमेश कुमार जुर्री यांचं घर आहे. इथे हळूहळू लोकांचे जथ्थे यायला लागले आहेत.
ऑक्टोबर
2005 साली रमेश कुमार यांच्या वडिलांचा
मृत्यू झाला. यानंतर त्यांचे धाकटे बंधू संजय यांनी गावातच घरची शेती पाहायला
सुरूवात केली. त्यांच्या कुटुंबाची गावात साधारण 9 एकर शेती आहे. त्यांच्या दोन बहिणी आहेत ज्यांचं लग्न शेजारच्याच
गावात करून दिलं आहे.
रमेश
आपली पत्नी आणि मुलगी सेजल यांच्यासोबत बिजापूरमध्ये राहात होते.
संजय यांना त्यांच्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी शेजारच्या एका मुलाने सांगितली.
रमेश यांचा धाकटा भाऊ संजय
जुर्री
ते
सांगतात की त्यांच्या भावाला कायमच पोलिसात भरती व्हायचं होतं. पण ते माओवादाने
प्रभावित असलेल्या भागात काम करायचे त्यामुळे भीती वाटायचे. घरच्यांची इच्छा होती
की, त्यांनी दुसरं काही काम करावं पण
रमेश यांनी ऐकलं नाही.
व्याकूळ नजरेने आपल्या मुलाला शोधणारे नातलग
रमेश
यांची आई सत्यवती यांच्या डोळ्यांचं पाणी थांबत नाहीये. त्यांच्या अवतीभवती
बसलेल्या बायका त्यांना धीर द्यायचा प्रयत्न करत आहेत. कोणी त्यांना पंख्याने वारा
घालतंय, तर कोणी पाणी पाजतंय.
रमेश यांची मावशी विद्या उसेंडी कांकेरमध्ये राहातात. त्या माहिती देताना सांगतात की सत्यवती जुर्री यांची तब्येत फारच खराब असायची. या आधारावर बदली व्हावी यासाठी अर्ज द्यायला रमेश तीन-चार दिवसांपूर्वी जगदलपूरला गेले होते. त्यांनी अर्जात म्हटलं होतं की ते घरात मोठे आहेत, त्यांच्या आईची देखभाल करणं त्यांची जबाबदारी आहे.
रमेश यांची मावशी विद्या
उसेंडी
हे
बोलता बोलता त्या हुंदके देऊन देऊन रडायला लागल्या. दुसऱ्या महिला त्यांना
सांभाळण्यासाठी पुढे सरसावल्या.
शांत स्वभावाचे रमेश
रमेश
यांचे वडील बस्तरच्या बैलाडी स्थित भारत सरकारचा उपक्रम नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट
कॉर्पोरेशनमध्ये कर्मचारी होते. रमेश यांचा स्वभाव अगदीच शांत आणि आज्ञाधारक होता.
त्यांचं शालेय शिक्षण बैलाडीला झालं तर कांकेरमध्ये त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण
केल्याचं रमेश यांचे एक काका सांगतात.
2010 मध्ये त्यांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांची निवड झाली.
रमेश यांची पत्नी सुनीता
गार्ड ऑफ ऑनर
रमेश
यांच्या घरापासून काही अंतरावर गार्ड ऑफ ऑनरची तयारी केलेली आहे. मैदानाच्या एका
बाजूला तंबू उभारला आहे. शेकडो महिला तिथे बसल्या आहेत, पुरुषांची आसपास वर्दळ आहे.
जिल्ह्याच्या
मोठ्या अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. आसपासच्या
भागातले लोकप्रतिनिधीही पोहचले आहेत.
प्रांगणात
दोन तीन गाड्या पोहचतात. पोलीस सांगतात की यापैकी एका गाडीतून रमेश यांची पत्नी
सुनिता आणि मुलगी सेजल बिजापूरहून इथे आल्या आहेत.
थोड्याच वेळात दुचाक्यांवर 'जय जवान, जय किसान' अशा घोषणा देत एक जवानांची तुकडी तिथे येते. या तुकडीच्या मागे काही गाड्या आहेत ज्यातल्या अँब्युलन्समध्ये रमेश यांचं शव आणलं आहे.
मृतदेह पाहून शेकडो महिला-पुरुष उठून उभे राहतात. त्यांच्या संयमाचा बांध फुटतो. आता प्रत्येकाला रमेशला शेवटचं पाहायचं आहे.आजीचे अश्रू आणि भांबावलेली नात
दुमदुमणाऱ्या
घोषणा आणि फुलांच्या वर्षावामध्ये एका उंचावरच्या जागी रमेश यांचं पार्थिव असलेली
पेटी ठेवण्यात आली. शोक व्यक्त करण्यासाठीची धुन वाजवत पोलिसांनी गार्ड ऑफ ऑनर
दिला. यानंतर कुटुंबातल्या सदस्यांनी आणि इतरांनी श्रद्धांजली वाहिली.
रमेश यांच्या पत्नीला पुन्हापुन्हा पतीचा चेहरा बघायचाय...पण महिला पोलिसांनी एकीकडे स्वतःचे अश्रू पुसत त्यांची समजूत काढली. या सगळ्यात चार वर्षांची सेजल भांबावून गप्प झाली होती...तिला जवळ घेऊन रडणाऱ्या आजीकडे ती पहात राहिली.
रमेश यांची आई सत्यवती आणि
मुलगी सेजल
0 Comments