भामरागड तालुक्यात निकृष्ठ रस्ता बांधकाम; एका महिन्यातच उखडले डांबरीकरण

भामरागड : तालुक्यात यावर्षी ठिकठिकाणी रस्त्यांचे बांधकाम (दर्जोन्नती) करण्यास सुरुवात झाली. काही कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम व डांबरीकरण केल्यामुळे एका महिन्यातच डांबरीकरण उखडून खड्डे पडणे सुरु झाले आहे. त्यामुळे शासनाचे कोठ्यावढी रुपये खड्ड्यात गेलेत की कोणाच्या खिशात ? याबाबतची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगू लागली असून तालुक्यातील डांबरीकरणं कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात यावर्षी रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे कामे करण्यात आले.



भामरागड तालुका मागास आणि ग्रामीण (अतिसंवेदनशील) भाग असल्याने इथे कामात मनसोक्त भ्रष्टाचार करता येईल असे काही कंत्राटदार व अधिकारी यांना वाटल्याने एका कंत्राटदाराने तर न केलेल्या कामाचे लाखो रुपये लाटले. नुकतेच त्या कंत्राटदारावर व संबंधित दोन अभियंत्यांवर पोलीसात तक्रार करण्यात आली आणि प्रशासनाकडून चांगलीच कारवाई सुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे आतातरी इतर कंत्राटदार “पुढच्यास ठेच, मागचा शहाणा” होईल असे वाटते होते. मात्र रस्त्यांचे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम पाहता त्यांचेवर काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.




ग्रामविकास मंत्रालय भारत सरकारच्या एका उपक्रमांद्वारे ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’अंतर्गत बोटनफुंडी-ताडगाव-मन्नेराजाराम-बामनपल्ली या 38 कि.मी. रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे (बांधकाम) काम एका कंत्राटदाराला देण्यात आले. याच कामात स्लॅब ड्रेन-४२ नग व नाली बांधकाम-१२८० मीटरचा समावेश आहे. तर सतरा कोटी एकोणपन्नास लाख रुपयाच्या कामाचा कार्यारंभ आदेश दिनांक १३ ऑगस्ट २०१९ असून कामाची मुदत १२ ऑगस्ट २०२० पर्यंत आहे. तसेच पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची हमीसुद्धा आहे. तसेच कंत्राटदारांनी कामाचा फलक न लावताच कामाला सुरुवात केली.





थातुरमातुर खोदकाम करुन गिट्टी भरली, त्यावर काही ठिकाणी मुरुम तर काही ठिकाणी माती टाकली. चक्क मातीवरच डांबरीकरण केले. ते सुध्दा अत्यल्प डांबर वापरून, केवळ 1 ते 2 इंचाचे हे डांबरीकरण एका महिन्यातच उखडले व माती दिसू लागली. डांबरीकरण सुरू असतांना काही ठिकाणी तीन दिवसांतच माती दिसू लागली, त्यामुळे जिंजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कृत सिताराम मडावी यांनी सदर कामावर आक्षेप घेतला असता, उकडलेला डांबर परत खोदून निट करून देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले. मात्र आतातर संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर उखडून खड्डे पडू लागले आहे आणि खड्ड्यात पाणी सुद्धा साचणे सुरु झाले आहे, काही ठिकाणी तर चक्क ये-जा करणाऱ्याचे पाय फसले आहे. दुचाकी व चारचाकी वाहन सुद्धा फसले आहेत. तसेच हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहताक्षणीच लक्षात येईल असे स्थिती आहे.
भामरागड तालुक्यात राजकीय नेतृत्वाचा अभाव आहे. येथील बहुसंख्य आदिवासी बांधव व जनता भोळी आणि अशिक्षित आहे. त्यामुळे व्यापक समाजहित लक्षात घेऊन, निर्भिडपणे सदर कामाची सखोल चौकशी करावी. तसेच अभियंत्यांचे समक्ष पुनश्च रस्ता खोदून गिट्टी, मुरूम डांबराचे पुनर्भरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments