संस्थात्मक अलगीकरण करतांना आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करा : ना.वडेट्टीवार
सावली तालुक्यामध्ये कोरोना आजारा संदर्भात आतापर्यंत केलेल्या उपायोजना सकारात्मक आहेत. मात्र संस्थात्मक अलगीकरण करताना नागरिकांना प्राथमिक सुविधा तसेच त्यांना एकाकीपणा येणार नाही, याची खातरजमा करा, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

आपल्या पाच दिवसीय दौऱ्यामध्ये गडचिरोली येथून पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यामध्ये आल्यानंतर तहसील कार्यालयात आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला मूल उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, नगराध्यक्ष विलास यासलवार, सभापती विजय कोरेवार, तहसीलदार पुष्पलता कुंभरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मडावी, पोलिस निरीक्षक राठोड, उपविभागीय अभियंता सी.बी.कटरे,  दिनेश चिरुनवार, आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील परिस्थिती प्रत्येक तालुक्यातील सकारात्मक पाठबळामुळे उत्तम आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये स्वतःच्या घरात गृह अलगीकरण होणे शक्य नसते. अशावेळी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवतांना आवश्यक प्राथमिक गरजा पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. सोबतच नागरिकांनी देखील कोरोना आजारापासून त्यांचे व कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागत असल्यामुळे, संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत असल्याचे समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आरोग्य विभागाने तालुक्यातील कोरोना संदर्भातील उपाययोजनेचा आढावा सादर केला. सावली तालुक्यामध्ये संस्थात्मक अलगीकरण, गृह अलगीकरणात असलेल्या नागरिकांची माहिती देण्यात आली. तालुक्यांमध्ये आत्तापर्यंत संशयित असणाऱ्या 59 लोकांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. सर्व अहवाल निगेटिव्ह  असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्यामध्ये आतापर्यंत बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची गावागावांमध्ये नोंद घेतली जात असून ग्रामस्तरावर सरपंच व आशा वर्कर यांच्यामार्फत यासाठी मदत मिळत असल्याची माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने पालकमंत्र्यांना दिली.

Post a Comment

0 Comments