मनपा क्षेत्रात मालमत्‍ता कर भरण्‍याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत करण्‍याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची शासनाकडे मागणी


कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेल्‍या लॉकडाऊनमुळे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक 31 मार्च पर्यंत मालमत्‍ता कराचा भरणा करू शकले नाही. ही मुदत वाढवून 31 डिसेंबर पर्यंत करण्‍यात यावी तसेच त्‍यावर कोणत्‍याही प्रकारचा दंड वा शास्‍ती आकारण्‍यात येवू नये, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाकडे केली आहे.

महाराष्‍ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 127 अन्‍वये महानगरपालिकांना मालमत्‍ता कर आकारणीचे अधिकार आहेत. 31 मार्चच्‍या आधी मालमत्‍ता कर संबंधित भोगवटदाराने भरणे बंधनकारक आहे. राज्‍यात सुरू असलेल्‍या लॉकडाऊनमुळे मध्‍यमवर्गीय नागरिकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  यामुळे 31 मार्च पर्यंत नागरिकांनी मालमत्‍ता कराचा भरणा केलेला नाही. मालमत्‍ता कराचा भरणा 31 मार्च पर्यंत न केल्‍यास कराधान नियम 51 अन्‍वये 2 टक्‍के शास्‍ती किंवा दंडाची आकारणी करण्‍याची तरतूद आहे. आज महानगरपालिका क्षेत्रात राहणारे नागरिक आर्थिकदृष्‍टया अडचणीत आहेत. त्‍यामुळे मालमत्‍ता कराचा भरणा करण्‍याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत करण्‍यात यावी तसेच यादरम्‍यान शास्‍ती किंवा दंडाची आकारणी करण्‍यात येवू नये, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाला केली आहे. त्‍याचप्रमाणे एक हजार फुटापर्यंतच्‍या घराला यावर्षापुरती मालमत्‍ता करातुन सुट देण्‍यात यावी अशी मागणीही त्‍यांनी केली आहे. राज्‍य शासनाने त्‍वरीत हा निर्णय घेवून महानगरपालिका क्षेत्रातील मध्‍यमवर्गीयांना दिलासा द्यावा, असेही आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. सदर मागणीचे निवेदन मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना ईमेलद्वारे त्‍यांनी पाठविले आहे. 

Post a Comment

0 Comments