विदर्भ राज्य आंदोलन समितीचे 30 जूनला “हमे काम दो ” आंदोलन

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे 30 जूनला “हमे काम दो ” आंदोलनसाठ वर्ष महाराष्ट्रात राहून आणि  विदर्भाचे तीन मुख्यमंत्री होऊनही विदर्भाचे कोणतेही प्रश्न सुटलेले नाही. विदर्भातील युवकांच्या हाताला काम नाही आणि आता विदर्भात चोवीस टक्के च्या वर बेरोजगारी वाढली आहे. अशा परिस्थितीत सरकारने गेल्या सहा वर्षांपासून बंद केलेली वर्ग तीन व चार ची नौकरभरती तातडीने सुरु करावी आणि विदर्भातील युवकांना नौकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हजारो बेरोजगार युवक दिनांक 30 जून 2020 रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचेकडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवून “हमे काम दो ”  आंदोलन करणार आहेत./span>
    महाराष्ट्रात राहून विदर्भात शेतकरी आत्महत्या, कुपोषण व त्यामुळे होणारे बालमृत्यू, सिंचनाचा अनुशेष,कर्जाचा डोंगर, लोडशेडींग,मोठया प्रमाणात वीज निर्माण होऊनही वीज कनेक्शन न मिळणे, राज्यातील 38 तालुक्यापैकी विदर्भातील 37 तालुक्यात वाढलेला नक्षलवाद आणि विदर्भात 24 टक्के वाढलेली बेरोजगारी यामुळे येथील युवकांवर मोठा अन्याय होत आहे.

 विदर्भाच्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हक्काचा शंभर कोटींचा निधी मिळाला नाही आणि गेल्या सात वर्षांपासून अनुकंपा तत्वाची आणि गेल्या सहा वर्षांपासून वर्ग तीन व चार पदाची नौकरभरती बंद आहे. आतातर सरकारने कोरोना च्या निमित्ताने आरोग्य, शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, मदत व  पुनर्वसन हे तीन विभाग सोडले तर 67 टक्के विदर्भातही अर्थसंकल्प कपात व परिणामी नौकरभरती न करण्याचे धोरण सरकारने घोषित केले आहे. त्यामुळे विदर्भातील सुशिक्षित,कुशल व अकुशल बेरोजगार युवकांमध्ये सातत्याने नैराश्याचे प्रमाण वाढत चालले आहे.


या बाबींकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधून बेरोजगारांनी नक्षलवादी चळवळीकडे वळू नये,म्हणून प्रामुख्याने विदर्भातील नोकरभरती तातडीने सुरु करावी आणि बेरोजगार युवकांना नौकरीच्या संधी तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी समितीच्या वतीने हजारो युवक  दिनांक 30 जूनला राज्याचे मुख्यमंत्री तथा सामान्य प्रशासन मंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे व  उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री मा.ना. अजित पवार यांचेकडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवून “हमे काम दो ” ची मागणी करणार आहे.
 हे विदर्भातील बेरोजगार युवकांचे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन समितीचे नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप, संयोजक राम नेवले,रंजना मामर्डे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले,प्रबिरकुमार  चक्रवर्ती,सरोज काशीकर, ऍड.मोरेश्वर टेमुर्डे, डॉ.जी.एस.खाजा,धनंजय धार्मिक,धर्मराज रेवतकर,मुकेश मासुरकर,प्रदीप धामणकर,  किशोर पोतनवार, प्रभाकर दिवे,मितीन भागवत,कपिल ईद्दे,अरुण मुनघाटे, प्रा.पुरुषोत्तम पाटील,मधुकर हरणे,अशोक पोरेड्डीवार,राजेंद्रसिहं ठाकूर,शालिक नाकाडे, चंद्रशेखर भडांगे, रमेश घुडसे, सचिन डाफे यांचेसह समितीच्या अनेक कार्यकर्त्यांनी केले आहे.   

Post a Comment

0 Comments