बारावीचा निकाल 14 जुलैपर्यंत, तर दहावीचा 30 जुलैपर्यंत जाहीर - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड :बारावी'चे वर्ग लवकर सुरु करण्याचे नियोजन


लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता उत्तरपत्रिका तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दहावीच्या 40-45 टक्के, तर बारावीच्या 65 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. या वर्षी दहावीचा निकाल 20 ते 30 जुलैदरम्यान, तर बारावीचा निकाल 5 ते 14 जुलैदरम्यान जाहीर करून 1 ऑगस्टपासून प्रवेशप्रकिया सुरु करण्याचे नियोजन झाले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.कोरोनामुळे राज्यातील शाळांची (पहिली ते दहावी) घंटा कधी वाजणार, हे अद्याप निश्‍चित नाही. शाळा सुरू करण्यापूर्वी अन्य राज्यांतील स्थितीची माहिती घेतली जात आहे. तरीही 15 जूनपासून शाळा सुरू करता येतील का, प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी विशेषकरून ग्रामीण भागातील शाळा मोकळ्या मैदानात दोन-तीन सत्रात भरवणे शक्‍य आहे का, यावर शनिवारी (ता. 6) बैठक आयोजित करण्यात आली होती. शाळा कधीपासून सुरु होतील हे सोमवारी (ता. 8) जाहीर होण्याची शक्‍यता आहे. तर पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये 1 सप्टेंबरपासून सुरु केली जातील, असेही नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबतीत विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना यापूर्वीच दिल्या आहेत.मंत्री गायकवाड म्हणाल्या 

►लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर 14 मेपासून उत्तरपत्रिका तपासणीला वेग 
►आतापर्यंत बारावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची पैकी सुमारे 60 टक्के, तर दहावीच्या एकूण उत्तरपत्रिकांपैकी 40 टक्के उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण 
►मुंबई, पुणे, सोलापूरसह अन्य भागांमध्ये सुरु आहे टप्प्याटप्प्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम 
►बारावीचा निकाल सर्वप्रथम 14 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल 30 जुलैपर्यंत जाहीर होईल 
►निकालानंतर दुसऱ्याच दिवसापासून सुरु होईल अकरावी प्रवेश; काही फेऱ्या कमी करून ऑगस्टअखेर प्रवेश प्रक्रिया संपविण्याचे नियोजन

'बारावी'चे वर्ग लवकर सुरु करण्याचे नियोजन

कोरोनाचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत असून दररोज सरासरी अडीच हजार रुग्णांची भर पडत आहे. तरीही जून महिन्यातील स्थिती पाहून सकाळ-दुपारच्या सत्रात बारावीचे वर्ग 15 जूनपासून सुरु करण्याचे नियोजन आहे. आगामी वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम परीक्षेपूर्वी पूर्ण व्हावा, या हेतूने विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान या विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू करण्याचे नियोजन झाल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments