10 वी, 12 वी निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका; बोर्डाकडून आवाहन

10 वी, 12 वी बोर्डाच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. अफवांवर आणि खोट्या मेसेज, वेबसाइटवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन एसएससी बोर्डाकडून करण्यात आले आहे. निकाल लागल्याचे सोशल मीडियावर मॅसेज व्हायरल झाले आहेत.

  फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या 10 वी आणि 12 वी परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे फेसबुक, व्हाट्सअपवर फिरणारे खोटे मेसेज, खोट्या लिंकवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे बोर्डाकडून आज सांगण्यात आले आहे. मंडळाची खोटी वेबसाइट तयार करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोशलमीडियावर केला जात आहे. याबाबत कारवाई करण्याचे मागणीचे पत्र युवासेनेकडून बोर्डाच्या अध्यक्षांना पाठविल्यानंतर याबाबत तातडीने याची दखल घेत बोर्डाने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.
खोटी वेबसाइट तयार करून मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी बोर्डाचे निकाल आज जाहीर होणार असल्याचे सांगत त्याद्वारे चुकीची अफवा पसरविण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. ही वेबसाइटची लिंक व्हाट्स अप, फेसबुकवर शेअर करत आज हा निकाल जाहीर होणार असे मॅसेज वायरल केले गेले.

इतकाच काय तर अनेकजण अगदी बोर्डाच्या मूळ वेबसाइटसारखी दिसणारी ही वेबसाइट खरी असल्याचं समजून विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्याचा सुद्धा यावर प्रयत्न केला. त्यातून अनेकांना निकाल जाहीर झाल्याचे आणि निकालाचे मेसेज सुद्धा पाठविण्यात आले तर काहींना मार्कशीट पण ऑनलाइन मिळाली. त्यामुळे या वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांची दिशाभूल होत असल्याचे कळताच युवासनेचे मुंबई विद्यापीठ व्यवस्थापकीय परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबकर यांनी याबाबत बोर्डाच्या अध्यक्षा शंकूतला काळे यांना पत्र लिहून याची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments